Uday Samant on Raigad guardian Ministry : महायुती सरकारने पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीमधील धूसफूस समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पालकमंत्रिपदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. यामध्ये शिवसेनेचे (शिंदे) मंत्री भरत गोगावले यांचा समावेश आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. दुसऱ्या बाजूला नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही वाद निर्माण झाला आहे. येथील स्थानिक मंत्र्यांना डावलून जळगावच्या गिरीश महाजन यांना नाशिकचं मंत्रिपद दिल्याने येथील शिवसैनिकांनी (शिंदे) नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना अजूनही या पालकमंत्रिपदांसाठी आग्रही असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

उदय सामंत म्हणाले, “रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत शिवसेना आजही आग्रही आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळायला पाहिजे ही माझी भावना आहे”.

उदय सामंतांची शिवसेनेवर (ठाकरे) टीका

दरम्यान, शिवसेनेने (ठाकरे) आज मुंबईत प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान दिंडी आयोजित केली होती. त्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले, “संविधानाच्या बाबतीत त्यांनी तयार केलेलं फेक नरेटिव्हचा (अपप्रचार) फुगा आम्ही फोडून टाकला आहे. आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी संविधान दिंडी सुरु केली आहे. यामध्ये किती राजकारण आहे ते लोकांना पहायला मिळत आहे. संविधानाच्या बाबतीत आमची आदराची भूमिका आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न जो करेल त्याच्याविरोधात शिवसेना उभी राहील. काँग्रेसकडे असणारी मुस्लीम व्होट बँक ही आता युबीटीकडे (शिवसेना उबाठा) गेली आहे. दुसऱ्या बाजूला, आम्ही पु्न्हा एकदा हिंदुत्वाचे वारसदार झालो आहोत हे दाखवण्यासाठी युबीटी लढत आहे. काँग्रेस मुस्लीम समाजाचे उद्धारकर्ते आहोत असा आव आणत स्वतंत्र लढत आहे आणि यूबीटीचं राजकीय धोरण काय आहे हे नेमकं कळत नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदय सामंत म्हणाले, “अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना कोणती आहे हे आता लोकांना कळायला लागलं आहे. काही लोकांना आता समजलं आहे की आम्ही यापूर्वीच एकनाथ शिंदेंबरोबर यायला पाहिजे होतं. एकनाथ शिंदे यांनी जे प्रामाणिक काम केलं आहे त्याची ही पोचपावती आहे. भास्कर जाधव यांना संघटनात्मक बांधणी कशी करायची हे चांगलं माहिती आहे. त्यांच्या नाराजीच्या वक्तव्यावर मी बोललो होतो. ते जर मार्गदर्शक म्हणून लाभले तर आमचा फायदाच आहे”.