Udayanraje Bhosale on Waghya Statue: रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी ही स्मारक रायगडावरून हटविण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर शिवरायांकडे वाघ्या नावाचा कुत्रा होता का? याबाबत ऐतिहासिक दाखले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली होती. आता या वादात साताऱ्याचे खासदार आणि छत्रपतींच्या घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना उदयनराजे भोसेल यांना वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “रायगड म्हटल्यावर आपल्यासमोर कुणाची प्रतिमा यायला हवी? छत्रपती शिवाजी महाराज की वाघ्या कुत्रा? वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याकडे तुम्ही नीट बघा. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतात कुठे आढळतो का? ही ब्रिटिशांची कुत्री आहेत. त्या पुतळ्याला द्या दणका आणि टाकून द्या. त्याचा एवढा विचार का व्हावा.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित राहणार आहेत.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी एक जुनी मागणी होती. मात्र पर्यावरणाच्या कारणास्तव इथे स्मारक होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अरबी समुद्राऐवजी राजभवनाच्या जागेत हे स्मारक व्हावे, अशी मागणी यावेळी उदयनराजे भोसले यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजभवनाकडे ४८ एकर जागा आहे. त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी आमची मागणी आहे. ही जागाही अरबी समुद्राला लागूनच आहे. राज्यपालांना राहण्यासाठी एवढी मोठी जागा कशाला हवी. या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.