राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार गेल्या आठवड्यात सातारा दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी सातारा लोकसभेचा आढावा घेतला. तसेच पक्षाची मोर्चेबांधणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांना माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी कॉलर उडवून उदयनराजेंची हुबेहूब नक्कल केली. ही नक्कल करून शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर आता उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील त्यांचे लोकसभेचे २२ उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु, यामध्ये सातारा लोकसभेचा समावेश केलेला नाही. उदयनराजे भोसले हे तीन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. उदयनराजे यंदा पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन आले. उदयनराजे दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. परंतु, भाजपाने अद्याप त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
दरम्यान, उदयनराजे यांनी साताऱ्यात लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींदरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी साताऱ्याची लोकसभा निवडणूक लढणार म्हणजे लढणारच! यावेळी उदयनराजेंना विचारलं की, शरद पवारांनी साताऱ्यात तुमच्यासारखी कॉलर उडवून तुम्हाला आव्हान दिल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल. यावर उदयनराजे भोसले म्हणाले, मी त्यावर काय बोलणार. शरद पवार हे वडीलधारे आहेत. माझ्या बारशाचं जेवण जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलणार…आणि ते स्टाईल वगैरे काही नसतं.
हे ही वाचा >> सातारा: कदाचित त्यांचा मला बिनविरोध करण्याचा विचार असेल-उदयनराजे
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावर साताऱ्यात ५,७९,०२६ मतं मिळवत शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. नरेंद्र पाटलांना त्यावेळी ४,५२,४९८ मतं मिळाली होती. मात्र त्यानंतर झालेली पोटनिवडणूक उदयनराजे भाजपाच्या तिकीटावर लढले. त्यावेळी त्यांना ५,४८,९०३ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीनिवास पाटील ६,३६,६२० मतं मिळवत विजयी झाले होते.