उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांना खुली ऑफर दिली होती. “राहुल गांधी जर हा सिनेमा पाहायला तयार असतील तर मी संपूर्ण थिएटर बूक करायला तयार आहे”, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी आता निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत महारॅली पार पडत आहे. या रॅलीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्या-येण्याचा संपूर्ण खर्च मी करतो. हॉटेलचा खर्च करतो, पण त्यांनी मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन यावं, त्यांचा सर्व खर्च करायला मी तयार आहे. एखादा चित्रपट निर्माता घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा : “…म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक केली”; उद्धव ठाकरे यांचा भाजपावर खळबळजनक आरोप

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “राहुल गांधी जर हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी संपूर्ण थिएटर बूक करायला तयार आहे. त्यांच्या एकट्यासाठी हा सिनेमा पाहण्याची व्यवस्था मी करेल. राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत. म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत. मी त्यांना आवाहन करतो, त्यांनी सावरकर हा सिनेमा पाहावा. ते सिनेमा पाहू इच्छित असतील तर मी माझ्या खर्चाने त्यांना सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करेल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

आता जागावाटपावर थेट २०२९ मध्येच चर्चा

महाविकास आघाडी समन्वय नाही, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुतीत तरी कुठे समन्वय आहे? पण आमच्यामध्ये समन्यव आहे. राहिलेल्या उमेदवारांची नावे येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येतील. आता यापुढे जागावाटपावर थेट २०२९ मध्येच चर्चा होईल”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.