शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार असलं किंवा हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र असले आणि हे पक्ष एकत्रितपणे आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असले तर त्यांच्यातली धुसफूस अधूनमधून पाहायला मिळते. अनेक नेते एकमेकांवरील नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. माजी आमदार रामदास कदम आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यामध्ये आघाडीवर आहेत. “मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली तरी विधानसभेला भाजपाने आमच्यासमोर बंडखोर उमेदवार उभे केले होते, असा आरोप गुलाबरावांनी केला आहे. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबरावांच्या आरोपांना उत्तरही दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, मला असं वाटतं की, मागच्या वेळी ज्या गोष्टी घडल्या त्या यावेळी घडू नयेत. त्यामुळे आमच्या (महायुती) महाराष्ट्र स्तरावरील नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यांना आम्ही सांगितलं की, मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपासाठी काम केलं. मात्र भाजपाने विधानसभेत आमच्यासमोर बंडखोर उमेदवार उभे केले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये असंही सांगितलं.
गुलाबराव पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही मन लावून काम करतोय. त्यामुळे सहाजिकच पुढील निवडणुकीत म्हणजेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला त्यांनी मदत केली पाहिजे. अशी अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. मागच्या वेळी ज्या गोष्टी घडल्या त्या पुढील काळात घडणार नाहीत असं आश्वासन वरिष्ठांनी आम्हाला दिलं आहे.
गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाजन म्हणाले, मागच्या वेळी भाजपाने कुठेही बंडखोर उमेदवार उभे केले नाहीत. बंडखोर उमेदवार कुठे उभे राहत असतील तर त्यांना आवरता येत नाही. तरीदेखील यावेळी कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
हे ही वाचा >> लोकसभा निवडणुकीत प्रहार आणि मनोज जरांगे एकत्र येणार? बच्चू कडू म्हणाले…
गिरीश महाजन यावेळी जागावाटपावरही बोलले. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील त्यांचे लोकसभेचे २१ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने मात्र केवळ दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुतीचे अद्याप १७ उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपावर चर्चा केली आहे. त्यावर दिल्लीतून शिक्कामोर्तब केलं जातं. राज्यातील ९० ते ९५ टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे. एक-दोन जागांचा तिढा बाकी आहे. त्यावर चर्चा चालू असून दोन दिवसांत तो प्रश्नदेखील निकाली काढला जाईल. येत्या एक-दोन दिवसांत आपल्याला समजेल की, नाशिकच्या जागेवर कोणता उमेदवार असेल, सातारा-माढ्याच्या जागेवर कोणता उमेदवार असेल, परभणीतून कोणाला तिकीट मिळेल. लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागतील.