दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत.

दिल्लीतील महारॅलीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईबाबत भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर का कारवाई करण्यात आली? याबाबत सांगत निवडणूक रोख्यांबाबतचे भाजपाचे बिंग फुटले. त्यामुळे या निवडणूक रोख्यांवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देशामध्ये सुरू असेलेल्या हुकुमशाही विरोधात कशा प्रकारे एकत्र येता येईल, याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत मला भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी सांगत होते. यावर आमची चर्चादेखील झाली होती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन यांच्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यामुळे आपल्याकडे हुकुमशाही येईल अशी भिती नाही, तर हुकुमशाही आलेली आहे. अनेक व्यक्ती अशा आहेत, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते. त्यानंतर त्यांनाच पक्षात घेत त्यांच्यावरील केस रद्द केल्या. दुसरीकडे जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर केस टाकल्या जातात आणि तुरुंगामध्ये बंद केले जाते. ही चांगली लोकशाही नाही. या हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर येऊन करणार आहोत. याबाबत सर्वांच्या मनात संताप आहे “, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’बाबत प्रश्न विचारताच पियूष गोयल यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

केजरीवाल यांना का अटक झाली?

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर गद्दारी करून सरकार स्थापन करण्यात आले. भाजपाने सगळ्या चित्र-विचित्रांना बरोबर घेण्याचे काम सुरू केले आहे. आता भाजपाकडचे जे ठग आहेत, त्यांच्यावरील केस मागे घेतल्या. मात्र, निवडणूक रोख्यांबद्दल भाजपाचे जे बिंग फुटले, त्याची चर्चा होऊ नये, म्हणून केजरीवाल यांना अटक करण्यात आली. निवडणूक रोख्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. यामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत, त्यांच्यावर धाडी टाकल्या गेल्या. त्यानंतर भाजपाला निवडणूक रोखे मिळाले आणि त्यानंतर त्याच कंपन्यांना अनेक कंत्राटे मिळाली. हे अशा प्रकारचे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.