अयोध्येत नुकताच राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर राम मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी झाल्याची दृश्य समोर आली. अखेर शेकडो सुरक्षा कर्मचारी या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी तैनात करावे लागले. या पार्श्वभूमीवर देशात एकीकडे लोकसभा निवडणुकांची चर्चा होत असताना दुसरीकडे अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाने प्रचारमोहीमच राबवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटानं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
“हनुमानाच्या शेपटीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या दाढीला आग…”
“नाशिकमध्ये गोदावरी तटावर जाऊन हजारो रामभक्त शिवसैनिकांसह महाआरती करून उद्धव ठाकरेंनी प्रभू श्रीरामाचरणी श्रद्धासुमने अर्पण केली. त्याचा राग महाराष्ट्राचे मिंधे मुख्यमंत्री व त्यांच्या बगलबच्चांना आला आहे. राग इतका की, हनुमानाच्या शेपटीप्रमाणे त्यांच्या दाढीस आग लागली. हनुमानाच्या शेपटीस आग लावल्याने रावणाची लंका जळाली. इथे मिंधे स्वतःच स्वतःचा जळफळाट करून घेत आहेत”, असा टोला सामना अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावण्यात आला आहे.
“राम मंदिर भाजपाच्या बडव्यांच्या हाती जाऊन…”
“श्रीराम जन्मभूमी सोहळा हा रामाचा कमी, मोदी यांचाच जास्त होता. मंदिर श्रीरामाचे की मोदींचे होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.महाराष्ट्रातील अनेक मंदिरे ही बडवे, दलाल वगैरेंच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आंदोलने झाली आहेत. आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भाजपच्या बडव्यांच्या ताब्यात जाऊन तेथे श्रद्धेचा राजकीय अपहार होणार असेल तर प्रभू रामांना भाजपमुक्त करावे लागेल”, अशा शब्दात ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे.
“…तेव्हा काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत?”, अजित पवार गटाची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका
“अजित पवारांनीही खासगीत मोदीमुक्त…”
“महाराष्ट्रात प्राणप्रतिष्ठेच्या शुभदिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय करत होते? मुख्यमंत्री मिंधे हे पूजा वगैरे करीत होते. ‘पाव’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिवसभर टाळ, भजनात दंग असल्याचे दिसले, पण अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री या सोहळ्यात व श्रद्धा कार्यक्रमात कोठेच दिसले नाहीत. ना त्यांनी पूजा केली, ना आरतीची थाळी फिरवली. संपूर्ण राज्य राम भजनात दंग असताना उपमुख्यमंत्री अजित पवार त्या दिवशी कोठे दिसलेच नाहीत, की त्यांनीही मोदीमुक्त रामाचे भजन खासगीत सुरू केले आहे?” असा खोचक सवाल ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
“एकतर उपमुख्यमंत्री पवार यांना भाजपची ही धार्मिक ढोंगबाजी अजिबात मान्य नसावी किंवा अजित पवार हे अद्यापि भाजपच्या प्रवाहात नीट सामील होऊ शकलेले नसावेत. यावर मुख्यमंत्री मिंधे किंवा फडणवीसांचे काय म्हणणे आहे?” असा प्रश्नही ठाकरे गटानं विचारला आहे.