आज महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मांडण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

“आजचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. काही जिल्हे अवकाळीच्या संकटात आहे. आज फक्त घोषणांचा पाऊस आहे. विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची नुसती घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही. मुंबईत रस्ते घोटाळा झाला आहे, इतर घोटाळे आहेत. टेंडरवर टेंडर काढली जात आहेत. महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे.”

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स संपावर आहेत त्यांचं काय?

“अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. औषधांविना, डॉक्टरांविना जी रुग्णालयं आहेत तिकडे लक्ष दिलेलं नाही. आधीच्या घोषणांचं काय झालं? त्याचा पाठपुरावा काहीही दिसून आलेला नाही. नव्या घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचा असं या सरकारचं धोरण आहे.” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मराठी भाषा, शिवरायांचे गड किल्ले यांबाबत काहीही भूमिका नाही. शिवस्मारकाचं जलपूजन मोदींच्या हस्ते झालं होतं पण त्याची गॅरंटी कोण घेणार? हे कुणीच सांगत नाही. पुढचं पाठ मागचं सपाट असा हा अर्थसंकल्प आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा Viral Video: सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नी नेमकं वानर अवतरलं आणि.., वाचा काय घडलं?

मनोज जरांगेंच्या मागे का लागता?

मनोज जरांगे जेव्हा आंदोलनाला बसले होते त्यादिवशी लाठीचार्ज केला गेला. छऱ्यांच्या बंदुका वापरल्या गेल्या, अश्रूधूर मारा झाला. अतिरेकी घुसलेत असं वागवलं गेलं. आमच्याकडून कोणी किती फोन केले? रश्मी शुक्लांना जरा विचारा. देवेंद्र फडणवीसांनी तो रेकॉर्ड घ्यावा. आम्ही जरांगेंच्या मागे असलो तरीही त्यांचं काय चुकतंय ते सांगा. कुणीही आंदोलनाला उभं राहिलं तर त्यांना गुन्हेगार ठरवलं जायचं? एखाद्याची मागणी पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे महत्त्वाचं असतं. जो विश्वासात घेऊ शकत नाही असा राज्यकर्त बिनकामाचा असतो. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मनोज जरांगेंच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा. आम्ही त्यांच्या मागे आहोत असा आरोप करत असाल तर एक ते दीड महिन्यापूर्वी गुलाल कुणी उधळला होता? फटाके कुणी फोडले होते? एसआयटी लावणार असाल तर चिवटपणाने चौकशी करा, मधेच सोडून देऊ नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.