Uddhav Thackeray On Cm Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वी जवळपास ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, सरकारने पॅकेज जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने विरोधक आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या संदर्भात बोलताना आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारला मोठा इशारा दिला आहे. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत राज्य सरकारला सोडणार नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मला आपत्तीग्रस्त शेतकरी दिसत आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे दुसरं कोणी असो किंवा नसो पण शिवसेना (ठाकरे) त्यांच्याबरोबर कायम असेल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम शेतकऱ्यांबरोबर राहिल हा शब्द मी याआधी देखील दिलेला आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
“गेल्या ८ दिवसांपूर्वी मी काही ठिकाणी दौरा केला होता, तेव्हा मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता की जो पर्यंत कर्जमाफी होत नाही, तो पर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही. कारण सध्या राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेतीला प्रतिहेक्टर तीन ते साडेतीन लाख सरकारने जरूर जाहीर केले, पण मी म्हटलं होतं की मदत हवी तर दिवाळीनंतर करा, पण त्यातील पहिले एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आधी टाका. शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण माफ करा, अशी आपली मागणी होती. मात्र, सरकारने तसं केलं नाही. आता दिवाळीनंतर मी मराठवाडा दौरा करणार आहे. आम्ही कधीही शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.