Uddhav Thackeray On Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या घटनेत वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. यातच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातो. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी आज (४ मार्च) राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचा फक्त राजीनामा नाही तर अजून ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सर्व आमदारांनी भूमिका मांडली. आता सर्वांना प्रश्न असा आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शीपणे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का? जर आले असतील तर मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का झाली नाही ?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचं उत्तर द्यायला पाहिजे. डिसेंबरपासून बीडच्या घटनेची चर्चा सुरु आहे. यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. मी त्यांच्या तब्येतीबाबत काही बोलणार नाही. पण राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय? नैतिक जबाबदारी की तब्येतीचं कारण? हे स्पष्ट करावं. कारण अजित पवारांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. आता बीडच्या घटनेतील एवढे फोटो बाहेर आल्यानंतर देखील धनंजय मुंडेंनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असेल तर याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा या आधीच का घेतला नाही? मग आता राजीनामा दिला आहे तर तो कोणत्या कारणाने दिला? हे देखील सांगितलं पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधितील सर्व फोटो अधिवेशनाच्या काळात बाहेर कसे आले? मग हे फोटो आधी बाहेर कसे आले नाहीत? जर हे फोटो आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत आले असतील तर त्यांनी धनंजय मुंडेंचा याआधीच राजीनामा का घेतला नाही? गेल्या दोन महिन्यांत सरकारने कोणतीही हालचाल का केली नाही? या प्रश्नाचं उत्तरही सरकारने दिलं पाहिजे. तसेच आता फक्त राजीनामा नाही तर अजून ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यावरही सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होतोय”, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.