Uddhav Thackeray : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सध्या प्रचाराचा धडाका सुरु असून प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते महाराष्ट्रात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे सभेसाठी दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत काही सवाल विचारले. ‘तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का? असा सवाल करत आता जर निवडणूक अधिकारी त्यांच्या बॅगा तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा : Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही. कारण लोक सांगत आहेत की, तुम्हाला विजय दिला. फक्त २० तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका. आता आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी देखील काढली. त्यामुळे तुमच्याही डोळ्यावर पट्टी असण्याची गरज नाही. तुम्ही डोळसपणे मतदान करा. मी कोणत्याही माणसांना दोष देत नाही, तर मी यंत्रणेला दोष देत आहे. मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा माझ्या स्वागतासाठी ८ ते १० जण उभे होते. मी त्यांना विचारलं की काय करायचंय? ते म्हणाले बॅग तपासायची. त्यांना म्हटलं तपासा. आता जे तुमची तपासणी करतात त्यांची ओळखपत्र देखील तुम्ही तपासा. तसेच ते जसे तुमचे खिसे वैगेरे तपासतात तसं तुम्ही देखील त्यांचे खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. तुम्हाला जर तपासणी अधिकाऱ्यांनी आडवलं तर तर अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रासह त्यांचे खिसे देखील तपासा, हा तुमचा अधिकार आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी यंत्रणेला सांगतो, तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? तपासायला हवी की नको? दाढीवाल्या शिंदेंची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटवाल्यांची तपासायला हवी की नको? फडणवीसांची बॅग तपासायला हवी की नको? पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभेसाठी येतात. मोदी आल्यानंतर रस्ते बंद होतात. मग हे रस्त्याने सुसाट जातात. मात्र, पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार असोत. यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. मग मात्र, पोलिसांनी मधे यायचं नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी मधे यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसं प्रचाराला जो कोणी येईन त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.