Uddhav Thackeray on Mumbai Maratha Reservation Protest : मनोज जरांगे मराठा आरक्षणाची मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (३० ऑगस्ट) त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत धडकले आहेत. या आंदोलकांची झोपण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची योग्य ती सोय होत नसल्याचा आरोप होत आहे. तर, दुसरीकडे शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलच चिखल झाला आहे. आज सकाळी देखील पावसाची रिपरिप चालू होती. त्यामुळे आंदोलकांचा दुसरा दिवसही पावसात भिजण्यात व चिखलात गेला.

दरम्यान, शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की “कंबर कसून सर्व मराठा आंदोलकांची मदत करा. त्यांच्यासाठी पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करा.”

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना संदेश

शिवसेनेने (उबाठा) समाजमाध्यमांवरून उद्धव ठाकरेंचा संदेश शेअर केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे, ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पाऊसपाण्यात-चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं आहे. अशा वेळी तमाम शिवसैनिकांना माझं आवाहन आहे की या बांधवांना पाणी, अन्न, शौचालये अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा. हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! जय महाराष्ट्र!”

आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल असल्याने आंदोलकांना मैदानावर बसता आलेलं नाही. त्यामुळे आंदोलक पालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोर किंवा मिळेल तिथे आसरा घेत आहेत. काही आंदोलक मात्र चिखलातच बसून असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की “मुंबईतील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी कुलुपं लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं आहे. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं समजत आहे. तसेच सामाजिक संघटना आंदोलकांना जी मदत पाठवत आहेत ती देखील अडवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समजत आहे.”