सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. राज्यपाल यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकाराणाची चिरफाड केली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “…तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे की, मी वारंवार म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल, तर तो आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही? याबद्दलचा असेल. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यामध्ये त्यांनी एकूणच सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची पूर्णपणे चिरफाड केली आहे.”

हेही वाचा- “राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हे सुप्रीम कोर्टाकडे…”, निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती, असं म्हणायलाही आता अर्थ उरला नाही. आता राज्यपालांची भूमिका सरळसरळ अयोग्य होती, असं म्हटलं तरी चालेल. राज्यपालांच्या भूमिकेचं न्यायालयाने वस्त्रहरण केलं आहे. आतापर्यंत राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त यंत्रणा होती. पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडवडे ज्याप्रकारे शासनकर्ते काढत आहेत, हे बघितलं तर येथून पुढे राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवायची की नाही, हा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.