Uddhav Thackeray Vs MNS : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. तर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्या राज ठाकरे यांना भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. परिणामी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
दरम्यान एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेमध्ये एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळते. अशात आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करत, “उद्धव ठाकरेंची काय दशा झाली ते बघा”, असे म्हणत टीका केली आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले, “बाळासाहेबांनी हिंदुत्वाची जी दिशा दाखवली, ती सोडल्यावर उद्धव ठाकरेंनी आपली काय दशा झाली ते पहावे. आता दारोदार फिरताय. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व आठवले. एकदा जाऊन श्रावणी करा आणि मग हिंदुत्वाचं नाव घ्या. दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले आहे, त्यासाठी तुम्हाला श्रावणी हेच प्रायश्चित आहे. त्यामुळे आमची दिशा आणि दशा बघू नका आम्ही खंबीर आहोत. राज ठाकरे खंबीर आहे हे सगळं पाहायला.” टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली.
विधानसभा निवडणुकीत मनसेला अपयश
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही माहिम विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. इथे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सदा सरवणकर यांच्यावर विजय मिळवला.
मनसेने २००९ विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकत राज्याच्या राजकारणात दमदार प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा राज्यातून एकच आमदार निवडून आला होता. पण, आता यंदाच्या निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहिली आहे.
हे ही वाचा : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे वरचढ
शिवसेना फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार कामगिरी करत ९ जागा जिंकल्या होत्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या होत्या. पण, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी दमदार पुनरागमन करत ५७ जागांवर विजय मिळवला. तर, उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला अवघ्या २० जागा आल्या. असे असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे.