Dasara Melava : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर जाणार आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा रंगणार आहे. या वर्षीच्या दसरा मेळाव्याचा टिझर आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हा टिझर पोस्ट केला आहे. ज्यामुळे राज ठाकरेही या मेळाव्यात येणार का? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
काय आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा टिझर?
परंपरा विचारांची,
धगधगत्या मशालीची,
महाराष्ट्रहितासाठी होणार,
गर्जना ठाकरेंची!
ठाकरे बंधूंच्या दोन महिन्यात चार वेळा भेटीगाठी आणि चर्चा
असा हा टिझर आहे जो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यातलं एक वाक्य लक्षवेधी ठरत आहेत. ते म्हणजे महाराष्ट्रहितासाठी होणार गर्जना ठाकरेंची. या मेळाव्याच्या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नाही फक्त हे वाक्य आहे. गर्जना ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंची एकट्याची की ठाकरे बंधूंची ही चर्चा आता सुरु झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन मनोमीलन झालं आहे. दोन्ही भाऊ जवळपास २० वर्षांनी एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर तर गणपतीच्या निमित्ताने आणि नंतर राज ठाकरेंच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दोनदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मागील दोन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चार भेटीगाठी झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या दोघांची आणि शिवसेना, मनसे या दोन्ही पक्षांची युती होण्याचे संकेत दोन्ही कडच्या नेत्यांनी दिले आहेत. दरम्यान या सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो दसरा मेळावा.
दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार?
दसरा मेळाव्याचं निमंत्रण आम्ही राज ठाकरेंना देऊ शकतो असं काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर आता टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो किंवा बोलतानाचा एखादा सीन नसणं शिवाय महाराष्ट्रहितासाठी गर्जना ठाकरेंची हे वाक्य असणं राज ठाकरेही या मेळाव्यात येणार का? याची चर्चा घडवणारं ठरतं आहे.
दसरा मेळाव्याच्या मंचावर राज ठाकरे येणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना हा पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला होता. सुरुवातीला त्यांना खूप चांगलं यश मिळालं. त्यांच्या पक्षाचे १३ आमदारही निवडून आले होते. तर नाशिक महापालिकेत त्यांना सत्ताही मिळवता आली होती. मात्र नंतर राज ठाकरे हे यश टिकवू शकले नाहीत. राजकीय कारणं असतील किंवा इतर अनेक कारणं होती ज्यामुळे असं घडलं तिकडे उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला भाजपासह युती केली होती. २०१९ ला मात्र उद्धव ठाकरेंनी सगळी समीकरणं बदलून टाकली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत जात मुख्यमंत्री होणं पसंत केलं होतं. ज्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. दरम्यानच्या या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेतलं आहे. त्यामुळे हे दोन बंधू एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. पण तसे संकेत राज ठाकरेंच्या एप्रिल २०२५ च्या मुलाखतीत आधी मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही टाळीला प्रतिसाद दिला. आता राज ठाकरे जर दसरा मेळाव्यात आले तर शिवसेना आणि मनसेची युती होणार हे निश्चित मानलं जाईल. त्यामुळे यंदाचा ठाकरेंचा दसरा मेळावा महत्त्वाचा आणि लक्षवेधी असणार यात शंका नाही.
