मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने अनेक ठिकाणी देव आणि धर्माचे मुद्दे मांडले होते. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास सर्वांना रामलल्लाचे (राम मंदिर, अयोध्या) मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या या प्रचारावर आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगावरील त्यांची नाराजी व्यक्त केली.
दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. पक्षाच्या या राज्य जनसंपर्क कार्यालयाचं मंगळवारी (५ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो का? कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीच्या नावाने मतं मागितली. तर मध्य प्रदेशात अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लांचं फुकट दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिलं नाही.
हे ही वाचा >> “भाजपाबरोबर जाण्याची पहिली भूमिका…”, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, YB सेंटरचा उल्लेख करत म्हणाले…
ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिलं नाही याचा अर्थ आम्ही काय मानायचा? होय! देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागायला तुमची काहीच हरकत नाही, असं आम्ही मानू का? उत्तर आलं नाही म्हणजे यावर तुमची काहीच हरकत नाही किंवा त्यास तुमची मान्यता आहे असं मानून आम्ही आगामी निवडणुकीत ‘जय भवानी… जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्यावेळी तुम्ही आमच्यावर कारवाई करता कामा नये, तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही.