राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा जवळ येतोय. त्याआधीच अयोध्या नगरी सजली आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रणं पाठवली जात आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानकांचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. रामभक्तांना अयोध्येत येण्याकरता कोणतीही अडचण येऊ नये याकरता सर्वतोपरी तयारी केली जात आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मला अद्याप कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला सर्वांचा आहे. माझी एकच विनंती आहे की, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट होऊ नये. रामलल्ला एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही. कोट्यवधी रामभक्तांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काहीजण शाळेतील पिकनिकसाठी गेले असतील

“बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिरप्रकरणी निर्णय कोर्टाने घेतला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला नाही. बाबरी ज्यांनी पाडली त्यातील अनेकजण हयात नाहीत. काहीजण शाळेतील पिकनिकसाठी त्यावेळी गेले असतील. पण सर्वांसाठी हा निर्णय श्रद्धेचा आहे”, असंही ठाकरे म्हणाले. “मला आमंत्रणाची गरज नाही. माझ्या मनात आलं तर मी आता जाऊन दर्शन घेऊ शकतो. मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यानंतरही मी तिथे जाऊन आलो होतो”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “कदाचित फडणवीसांच्या वजनानेच बाबरी…”, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले, “मी त्यांना धन्यवाद देतो की…”

आडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर…

“इथे मीच सगळं केलं अशी फुशारकी कुणी मारू नये. तिथे हजारो करसेवकांनी लढा दिला होता. त्यासाठी आडवाणींचे खास धन्यवाद आहेत. आडवाणींनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा आलाच नसता. मी तर ऐकलं की आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनाही निमंत्रण नव्हतं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. ‘फडणवीस म्हणतात बाबरी पाडताना आम्हीच होतो – शिवसैनिक असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं’ असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर उद्धव ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली.

“देवेंद्र फडणवीसच चढले असतील आणि त्यांच्या वजनानेच बाबरीचा ढांचा पडला असेल तर मला माहिती नाही. पण तेव्हा सुंदरसिंह भंडारी, लालकृष्ण आडवाणी यांच्या याबाबत प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे फडणवीसांचा गृहपाठ थोडा कमी पडला असावा. काही लोक त्यांच्या शाळेच्या सहलीसाठी कदाचित गेले असतील तिथे. त्या वयाचे होते ते तेव्हा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.