अलिबाग येथील उसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील करोना परिस्थिती, मास्कमुक्ती संदर्भातील प्रश्न आणि लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन वर्षात रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पीटलचे उदघाटन आणि श्रेणीवर्धनाचे सर्वाधिक काम  महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करण्यात आली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने करोनाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. छत्रपतींच्या शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय आम्ही उभे करत आहोत.”

लसीकरण वाढवणं आवश्यक –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार, मास्कमुक्ती कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण मास्कमुक्ती नेमकी कधी होणार, याबद्दल आताच खात्रीने काहीही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे, कितपत योग्य आहे, याबद्दल डॉक्टर सांगतील. परंतु आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही करोनाची लागण होते. पण त्याची घातकता नक्कीच कमी होते. जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.