अमरावती : येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी युसूफ खान (४४) याचे आणि उमेश कोल्हे यांचे चांगले संबंध होते आणि तो कोल्हे यांच्या अंत्यविधी कार्यक्रमातही सहभागी झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. त्यात युसूफ खान याचा समावेश आहे. युसूफ खान हा पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, तर उमेश कोल्हे हे पशूवैद्यकीय औषधी विक्रेते होते. दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते, त्यामुळे कोल्हे यांच्याशी तो संपर्कात होता. कोल्हे यांच्याकडील काही कार्यक्रमांमध्ये देखील युसूफ खान सहभागी झाला होता. एवढेच नव्हे, तर कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या वेळी तो उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी युसूफ खानला तांत्रिक तपासाच्या आधारे शुक्रवारी रात्री अमरावतीतून ताब्यात घेतले.

या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी उमेश कोल्हे यांचे बंधू महेश कोल्हे यांनी केली आहे. व्हाट्सपवरील एक संदेश केवळ दुसऱ्या समूहात पाठवला म्हणून उमेशची हत्या होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केल्याने लवकरच न्याय मिळेल, अशी कोल्हे कुटुंबातील सदस्यांना अपेक्षा आहे.

गेल्या २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. अकरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा संबंध नुपूर शर्मा प्रकरणाशी असल्याचा निष्कर्ष काढला.