भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने अमरावतीत ५४ वर्षीय मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला आहे. उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात भाजपानं सोमवारी सकाळी अमरावतीत शोकसभेचं आयोजन केलं आहे.

राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी रविवारी अमरावती पोलिसांकडे शोकसभा आयोजित करण्याची परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिला. या शोकसभेला विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांसह किमान २ हजार ५०० लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे पक्षाने पोलिसांना सांगितले होते.

अमरावती शहरातील राजकमल चौकात सकाळी ११ वाजता ही शोकसभा पार पडणार असल्याचे भाजपाने जाहीर केलं आहे. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी कोल्हे यांच्या मुलाला आणि कुटुंबाला शोकसभेस हजर राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत कोल्हे यांचा धाकटा भाऊ महेश याने रविवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “शोकसभा आयोजित करण्यासाठी भाजपानं आमची परवानगी घेतली नाही पण शोकसभा आयोजित करण्याला आमचा विरोध नाहीये. शोकसभेला उपस्थित राहून आम्ही आमच्या भावना व्यक्त करू. पण मी त्यांना (भाजपा आणि विहिंप) कळकळीने विनंती करतो, की ही सभा पूर्णपणे शांततेत पार पाडावी. याठिकाणी कोणतीही भाषणं होऊ नयेत. कारण माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळावी आणि माझ्या कुटुंबाचं नाव खराब होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.”