शिर्डी : ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिकांपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. महाराष्ट्रात भाजपची इतकी अजेय व बलशाली उभारणी करावी की, पुन्हा कोणाचीही दगाबाजी करण्याची हिंमत होणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. प्रदेश भाजपच्या ‘महाविजयी अधिवेशना’च्या रविवारी झालेल्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राज्यात भाजपची वाटचाल शत प्रतिशतकडे राहील, असे संकेत देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रालोआला विजयी करण्याचे आवाहनही शहा यांनी केले.

शहा यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे (शप) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. पवार यांनी १९७८ पासून दगाबाजीचे राजकारण सुरू केले, त्यांना जनता व भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाडले. भाजप आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही त्यांची जागा दाखवून घरी बसविले. प्रचंड बहुमताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार जनतेने सत्तेवर आणले आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या विजयामुळे देशातील राजकारणाचीही दिशा बदलली आहे. परिवारवादाला नाकारून हिंदुत्व आणि विचारांनी एकत्र असलेल्या खरी शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अप) यांना जनतेने सत्तेवर आणले.

हेही वाचा >>> Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा मिळू देऊ नका आणि एनडीएला सत्तेवर आणतानाच भाजपला विजयाचे सूत्रधार करण्याचे आवाहन शहा यांनी केले. शहा यांनी एक-दोनदा एनडीएच्या विजयाचा ओझरता उल्लेख केला, तरी सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात भाजपला शक्तिशाली व अजेय करण्यावर प्रामुख्याने भर देत पुढील राजकीय वाटचाल ‘शतप्रतिशत’कडे राहील, असे संकेत दिले. भाजपची ताकद वाढविण्यासाठी दीड कोटीहून अधिक सदस्यनोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मतदान केंद्र स्तरावर घरोघरी जाऊन प्रयत्न करावेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनी, कृषीपंपांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळत असलेले शेतकरी आदी लाभार्थींना सदस्य करून घेण्याच्या सूचना शहा यांनी दिल्या. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते, पण ते दुष्काळी भागात पाणी पोचवू शकले नाहीत व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत. मात्र फडणवीस सरकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे शहा म्हणाले.

हेही वाचा >>> Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंतच्या विकसित भारताच्या संकल्पनेला व विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील प्रचंड विजयाने हेच दाखवून दिले आहे. अमित शहागृहमंत्री