सांगली : सांगलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बुधगाव बसस्थानकालगत असलेल्या बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम’ फोडून अज्ञातांनी सुमारे साडेसतरा लाखांची रोकड लंपास करण्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. ‘गॅस कटर’ने ‘एटीएम’ फोडून मशिन जाळण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला.

बुधगाव बस स्थानकानजीक बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम’आहे. आज सकाळी एटीएमशी छेडछाड करण्यात आल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती तत्काळ सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवली. पोलीस निरीक्षक किरण चौगले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पथकाला सूचना दिल्या. बसस्थानकाजवळ असणाऱ्या ‘एटीएम मशिन’ला ‘गॅस कटर’ने तोडून त्यातील रोकड ठेवलेला कप्पा फोडून त्यात असलेली रक्कम लंपास केली आहे. जात असताना ‘एटीएम’ला आग लावण्याचा प्रयत्नही केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एटीएम’मधून सुमारे १७ लाख ३४ हजार ४०० रुपये लंपास केले आहेत. ‘एटीएम’सोबत असलेली संगणकीय माहितीचीही नासधूस झाली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. फिर्याद दाखल झाल्यानंतरच लंपास रकमेबाबत अधिकृत माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चोरट्यांचा तपास करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके तैनात करण्यात आली. असाच प्रकार इचलकरंजीमध्येही घडला असल्याचे वृत्त असून दोन्ही घटनांमध्ये साम्य शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.