सावंतवाडी : पावसाळा संपला तरी पाठ सोडायला तयार नसलेल्या अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन कापणीच्या वेळी सुरू झालेल्या या पावसाने भात आणि नाचणी पिकांचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे ‘हातचे पीक’ पाण्यात कुजत आहे.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४,८८३ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. सध्या भात आणि नाचणी पिकाची कापणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ऑक्टोबर २०२५ मधील या पावसामुळे बाधित गावे १३६ असून बाधित शेतकरी १०१८ आहेत. यामध्ये नुकसानीचे क्षेत्र १९६.०२ हेक्टर आहे.
प्रामुख्याने भात आणि नाचणी जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या कृषी अधिकारी कार्यालयामार्फत हा नुकसानीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग यांना सादर करण्यात आला असून, तो आता पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांचा डोंगर
पीक कुजतेय: कापणी करून शेतात ठेवलेले भात पीक पूर्णपणे भिजले असून ते जागेवरच कुजू लागले आहे.जी पिके अजून कापायची आहेत, ती परिपक्व होऊनही सततच्या पावसामुळे जमिनीवर भिडली (लोळली) आहेत. कापणी केलेले पीक मळणी यंत्राद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने मळले जाते, पण पावसामुळे मळणीच्या कामात मोठे अडथळे येत आहेत.
चाऱ्याचा प्रश्न: शेतकरी सांगतात की, पाळीव जनावरांसाठी आवश्यक असलेले गवत (चारा) अशा पावसामुळे मिळणेही अशक्य होत आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीत वर्षभराची मेहनत कापणीच्या तोंडावर वाया गेली आहे, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कृषी विभागाचे आवाहन
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, मदतीसाठी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
माहिती द्या: ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी. माहिती मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी शेतीची प्रत्यक्ष पाहणी करतील.
अधिक माहितीसाठी ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वेळेत माहिती दिल्यास नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते. “नुकसानीची माहिती वेळीच द्या, अन्यथा सरकारी मदत हुकण्याची शक्यता आहे,” अशी वस्तुस्थिती आहे.
