धाराशिव : धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला गुरूवारी रात्री वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे धाराशिव तालुक्यातील इर्ला, भंडारवाडी, दाऊदपूर व तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, अणदूर, खुदावाडी या परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. कुठेही जीवितहानी झाली नाही. मात्र बागायती पिके, घरांचे नुकसान होवून आर्थिक हानी झाली आहे. तर झाडे व पत्रे पडून जनावरे जखमी झाले आहेत.

हेही वाचा >>> ‘दुष्काळ आढावा बैठकीला मराठवाड्याचेच मंत्री गैरहजर’; शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याची..”

धाराशिव तालुक्यातील इर्ला, दाऊदपूर व भंडारवाडी येथे गुरूवारी रात्री अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पपई, लिंबू, संत्री, केळी अशा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरावरील पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून नुकसानग्रस्त बागा, घरे आणि जखमी जनावरांची पाहणी केली व शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच महसूल प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तुळजापूर तालुक्यातील अणदूर, खुदावाडी, कुन्सावळी, मंगरूळ या भागातही मोठ्या प्रमाणात वादळी वारे होते. पाऊस कमी व वादळी वारे तीव्र स्वरूपाचे असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यालगतची  झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. आमदार पाटील यांनी प्रशासनाला सूचना देवून रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक खुली करून दिली. तसेच नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश धाराशिव व तुळजापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> अनंत अमुची ध्येयासक्ती! आईने मुलासह बारावीची परीक्षा देऊन मिळवले ८३ टक्के गुण

मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू

धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील भंडारवाडी, इर्ला, दाऊपूर, मंंगरूळ, अणदूर, खुदावाडी, कुन्सावळी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि पाऊस झाला. यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच लिंबू, पपई, केळी या बागायती पिकांचेही मोेठे नुकसान झाले आहे. तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्तांशी बोलताना सांगितले.