अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातल्या वादाची दोन महिन्यांपूर्वी जोरदार चर्चा झाली होती. प्रकरण थेट राज्य महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलं होतं. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांच्याविरोधात मारहाणीची शक्यता व्यक्त करत राज्य महिला आयोगाकडे तक्रारच दाखल केली होती. हे प्रकरण थंडावत असतानाच आता पुन्हा एकदा या दोघींमधलं भांडण डोकं वर काढण्याची शक्यता आहे. याला कारणभूत ठरला आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ्ड व्हिडीओ! या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली असताना त्यावरून उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

शीतल म्हात्रेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका रॅलीमध्ये गाडीवर उभे असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ्ड करून त्यासह चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा संदेश व्हायरल केला जात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. तसेच, यासंदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर दोन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

चित्रा वाघ यांचा व्हिडीओ संदेश

या प्रकारावर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ संदेश ट्वीट करत आपण शीतल म्हात्रे यांच्या पाठिशी असल्याचं नमूद केलं. “शीतल (म्हात्रे)…तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादीत नाहीच. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे की या हरामखोरांना सोडू नकाच. पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं.

“अपना टाईम भूल गई”

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या याच ट्वीटवर उर्फी जावेदनं खोचक ट्वीट केलं आहे. “कोई इस औरत को बताओ की हिपोक्रसी की भी सीमा होती है”, असं उर्फी जावेदनं हिंदीतून केलेल्या या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. “अपना टाईम भूल गई, जब मेरे कपडों की वजह से मेरे कॅरेक्टर पे उंगली उठा रही थी. मुझे जेल भेजने की मांग कर रही थी. खुलेआम मेरा सर फोडने की धमकी दी थी. व्वा, व्वा, व्वा!” असं उर्फीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण: आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच जणांना पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता शीतल म्हात्रे प्रकरणावरून पुन्हा एकदा या दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.