पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण सप्तरंगाने उजळले आहे. धरणातून कोसळणाऱ्या पाण्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अकोल्यातील विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभागाने केलेल्या कामामुळे धरणातील पाणी सप्तरंगाने झळाळून निघाले. ही रोषणाई कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता अजित सोळंके यांनी दिली.

अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील सिंभोरा या गावाजवळ अप्पर वर्धा धरण आहे. अमरावती आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण येते. गेल्या काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलविद्युत व उपसा सिंचन विभागाकडून धरणांवर विजेचे दिवे लावण्यात येतात. अप्पर वर्धा धरणाचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून याचे काम सुरू होते. नागपूर येथील कंत्राटदार कंपनी मेसर्स न्यू टेकचे प्रदीप देशमुख, राजू भोयर व प्रफुल्ल मोहोड यांनी हे काम पूर्ण केले. रविवारी सायंकाळपासून ही रोषणाई सुरू करण्यात आली. धरणातून निघणारे पाणी सप्तरंगाने झळाळून निघाले. रंगीत पाण्याचा कोसळणारा प्रवाह मंत्रमुग्ध करणारा ठरत आहे. हे दृष्य मनमोहक असल्याची भावना व्यक्त होत आहे. नेहमीप्रमाणे मूळ अंदाजपत्रकानुसार हे कार्य करण्यात आले असून त्यासाठी कुठला अतिरिक्त खर्च लागला नसल्याचे कार्यकारी अभियंता अजित सोळंके यांनी सांगितले.