उरण : सोमवार (२६ मे ) पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास २५ रुपयांनी महागणार आहे. पावसाळ्यात अनियमित जलप्रवासामुळे महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाकडून मोरा ते मुंबईच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रवासाकरिता प्रवाशांना एका फेरीसाठी ८० ऐवजी १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ चार महिन्यांसाठी लागू राहणार असून १ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा ८० रुपये दर करण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून उरणच्या मोरा ते मुंबई दरम्यानची जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू असते. मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा पावसाळ्यात बंद असते. अशा स्थितीतही समुद्रातील लाटांचा सामना करीत मोरा-मुंबई सेवा सुरू असते. उरण ते नेरुळ बेलापूर ही लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या ही घटली आहे. या घटलेल्या प्रवासी संख्येचा फटका या विभागाला बसला आहे. असे असले तरी या मार्गाने परंपरागत प्रवास करणारे प्रवासी आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू आहे. या सेवेसाठी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मोरा मुंबई जलमार्गासाठी २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.

मोरा – भाऊचा धक्का हा प्रवास फायदेशीर, सुखद आणि जलद म्हणून ओळखला जातो. वाहतूककोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. यात मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. मात्र, तिकीट दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ होत नाही. उलट प्रवाशांना गळक्या प्रवासी बोटींसह इतर समस्यांचा सामना करावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


करंजा ते रेवस मार्गावर भार

मोरा ते मुंबई प्रमाणेच उरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा रेवस मधील जलसेवा पावसाळ्यात सुरू असते. त्यामुळे अलिबाग ते मुंबई असा प्रवास करणारे प्रवासी हे करंजा रेवस मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशात वाढ होत असल्याने या प्रवाशांचा भार वाढणार आहे.