सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणीप्रकरणी विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह १२ जणांना आज (दि. ३) रोजी चौकशीसाठी वडूज पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अनेक आरोप केले होते. या वेळी राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात नंतर संबंधित महिलेस खंडणी घेताना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी खंडणी मागितल्याच्या आरोपातून मुक्त पत्रकार तुषार खरात यांच्यासह शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणावरून विधानसभेतही गोंधळ उडाला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरे यांच्या विरोधात कारस्थान करून त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नात राज्यातील अनेक नेते सामील असल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत दिली होती. याप्रकरणी त्यांनी खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांच्यावर संशय व्यक्त केला होता. गोरे यांनीही मागील आठवड्यात माझी बदनामी करणारे खरे चेहरे लवकरच समोर येतील, असे म्हटले होते.

याप्रकरणी केलेल्या तपासाच्या आधारे साताऱ्यातील वडूज पोलिसांनी एकूण १२ जणांना नोटीस देत चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला असल्याचे तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.