Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. १६ मे रोजी वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यानंतर हगवणे कुटुंबियांचे राजकीय लागेबंधे, त्यांचा पोलिसांवर असेलला प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमी याबद्दल माहिती समोर येत आहे. वैष्णवीची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे-जगताप यांनी माध्यमांसमोर स्वतःवर आणि वैष्णवीवर झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. वैष्णवीचा मोबाइल हगवणे कुटुंबाने काढून घेतला होता. तसेच तिला उन्हात उभे करून शिक्षा दिली होती, असे मयुरी हगवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मयुरी हगवणे यांनी स्वतःवर झालेल्या अत्याचाराची विस्तृत माहिती माध्यमांना दिली. तसेच मारहाण झाल्यानंतरचे फोटोही दाखवले. एक-दोन वेळा नाहीतर अनेकदा हगवणे कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप मयुरी यांनी केला. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आपण पती-पत्नी दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याचेही त्या म्हणाल्या. याशिवाय वैष्णवी घरात शशांकबरोबर राहत असताना तिच्यावरही अत्याचार होत होता, अशी माहिती घरातील नोकरांकडून मिळत असल्याचा दावा मयुरी यांनी केला.
मयुरी हगवणे म्हणाल्या की, वैष्णवी माझी सख्खी जाऊ असूनही आम्ही दीड वर्षात फारशा बोललो नाहीत. हगवणे कुटुंबियांनी जाणुनबुजून आम्हाला एकमेकींच्या जवळ येऊ दिले नाही. माझ्याबद्दल तिच्या मनात वाईट गोष्टी भरविण्यात आल्या होत्या. माझी नणंद करीष्मा हगवणे वैष्णवीने माझ्याशी बोलू नये, म्हणून प्रयत्न करायची.
शशांककडून भावालाही धमकी
माझ्या पतीने शशांकला समजविण्याचा प्रयत्न केला होता. वैष्णवीला त्रास देऊ नको, असे त्याने सांगितले होते. मात्र शशांक माझ्या पतीलाच उलट बोलला. आमच्यामध्ये पडू नकोस. तसेच तुझे आणि वैष्णवीचे काहीतरी असावे, म्हणूनच तू तिची काळजी घेतोयस, असे घाणेरडे आरोपही शशांक करत असल्याचा दावा मयुरी हगवणे यांनी माध्यमांशी बोलताना केला. आम्हाला वैष्णवीचा त्रास दिसत होता, पण आम्ही कुटुंबाच्या विरोधामुळे बोलू शकलो नाहीत, असेही मयुरी हगवणे यांनी सांगितले.
वैष्णवीकडून हुंडा घेतल्याचा माज शशांकला होता, असेही मयुरी म्हणाल्या. ‘मी बायकोला धाकात ठेवतो. तिच्या घरच्यांकडून ब्रँडेड वस्तू घेतो’, असा मोठेपणा शशांक मिरवत असे. माझ्या पतीलाही तो या गोष्टी सांगून मला ताब्यात ठेवण्याबद्दल सूचना देत असे. पण माझ्या पतीने मला कधीही चुकीची वागणूक दिली नाही. त्यावरूनही त्याला त्रास दिला जात होता. तसेच त्याच्या मित्रांमध्ये त्याची बदनामी केली जात होती, असाही आरोप मयुरी यांनी केला.
वैष्णवीला उन्हात उभे केले
वैष्णवी गर्भवती असताना हगवणे कुटुंबियांनी तिला बाहेर उन्हात उभे ठेवले होते, असे मयुरी यांनी सांगितले. हगवणे कुटुंबिय दुष्ट असल्यामुळे ती त्यांना खूप घाबरत होती. माझ्या पतीने मला खंबीर साथ दिल्यामुळे माझा जीव वाचला. पण वैष्णवीला तिच्या पतीची साथ मिळाली नाही. त्यामुळे तिच्या मनात कदाचित अपराधीपणाची भावना निर्माण झाली असावी, असेही मयुरी हगवणे यांनी सांगितले.
ताजी अपडेट
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक झाल्यानंतर सुशील हगवणे यांच्या पत्नी मयुरी हगवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अटकेसंदर्भात समाधान व्यक्त केले. ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला, त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, असेही मयुरी हगवणे यांनी सांगितले. माझे पती सुशील हगवणे यांनी फरार न होता त्यांनी जर पुढे येऊन सर्व सांगितले असते, तर त्यांच्यावर आज झालेली कारवाई झाली नसती, असेही त्या म्हणाल्या.