Vaishnavi Hagawane Death Case Update : मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तिच्या लग्नात जवळपास कोट्यवधी रुपये खर्च आला होता. शिवाय ५१ तोळे सोन्यासह रोख रक्कमही हुंडा म्हणून देण्यात आली होती. दाग-दागिने, जेवणावळीवर लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या कस्पटे कुटुंबियांनी वैष्णवीच्या लग्नातील रुखवतासाठीही लाखो रुपयांचा खर्च केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे हे लाखो रुपये वैष्णवीच्या नवऱ्याच्या मामीला देण्यात आले होते, असा दावा अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात त्यांनी सविस्तर पोस्ट केली आहे.
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “हा घ्या एक मोठा पुरावा. वैष्णवीच्या वडिलांकडून एक लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले. दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का?” यासोबतच अंजली दमानिया यांनी बँक स्टेटमेंटही जारी केले आहेत. ज्यात पूनम जालिंदर यांच्या खात्यावर १ लाखांचा व्यवहार केल्याचं दिसतंय.
ष्णवीचे पती शशांक हगवणे याचे जालिंदर सुपेकर हे मामा आहेत. हगवणे बंधुंना शस्त्र परवाना मिळवून देणे, मयुरी हगवणेची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवण्यास हस्तक्षेप करणे आदी आरोप सुपेकर यांच्यावर होत आहेत. त्यातच कारागृहातील कैद्यांसाठीच्या खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तुंमध्ये सुपेकर यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना मदत करणारे ‘उच्चपदस्थ’ म्हणून चौफेर टीका होत असलेले कारागृह प्रशासनाचे क्रमांक दोनचे अधिकारी ‘विशेष पोलीस महानिरीक’ (कारागृह) जालिंदर सुपेकर यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची पदस्थापना आता गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक करण्यात आली आहे.
निलेश चव्हाणला अटक
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली