कराड : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत सहा दिवसांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज तोंडाला काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दंगलीचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना, त्यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांना अटक करावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.

पुसेसावळी दंगल आणि त्यात नूरहसन शिकलगार या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी काल अटक केलेल्या २३ जणांना पोलीस कोठडी मिळाली असून, एकूण ५७ जण पोलीस कोठडीत आहेत. तर, सण-उत्सव येत असल्याने पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे निघणार नसल्याचा निर्णय पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत काल घेण्यात आला. परंतु, मोर्चा काढण्यासाठी आक्रमक असलेल्या संघटनांनी हे आंदोलन छेडले.

हेही वाचा >>> “आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो नाही..”, मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींची घोषणा करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

पुसेसावळीत रविवारी (दि. १०) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत अल्पसंख्याक समाजातील एक तरुण मृत पावताना दहाजण जखमी झाले होते. यानंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल होऊन हा दोन समुदायातील संघर्ष असल्याचे स्पष्ट झाल्याने सण–उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही मोर्चे काढू नयेत, आक्रमक आंदोलन करू नये यासाठी पोलीस व प्रशासनाचे प्रयत्न काल यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दंगलीतील अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आज शनिवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र येत तोंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन छेडण्यात आले. मोर्चाचा इशारे देणाऱ्यांनी हा आंदोलनाचा पवित्र घेतला आणि त्यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या चौकशीची व अटकेची मागणी करण्यात आली. निषेधकर्त्यांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणारे निवेदन वाचून दाखविण्यात आले.

हेही वाचा >>> आमदार अपात्रतेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी संदर्भ दिलेले ‘शेड्यूल १०’ काय आहे? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, पुसेसावळीत घडलेल्या घटनेची सत्यशोधन समितीची नेमून चौकशी करावी. अल्पसंख्यांक समाजाविषयी सातत्याने गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करुन मुस्लिम समाजाविरोधात भडकावू वातावरण करणारे विक्रम पावसकर यांना अटक करावी. हिंसाचारात बळी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला २५ लाख रुपये भरपाई मिळावी, पंचनामे व या प्रकरणातील जबाब दबावाखाली झालेले असल्याने ते आम्हाला मान्य नसून फेर पंचनामे करावेत. मागील सहा महिन्यातील समाजमाध्यमावरील  प्रक्षोभक पोस्टची चौकशी व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी येत्या २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देताना, त्याच दिवशी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनानी दिला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या वेळी तैनात होता. दरम्यान, कराडमध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी या दंगलीमागे सातारा, कराड व पुसेसावळीतील काहीजणांचा हात असून, त्यात सहा जणांची नावे जाहीर करत या एकंदरच प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पत्रकार परिषदेत मोर्चाला महामोर्चाने प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला होता.