दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. परंतु, या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद झाले. ही जागा ठाकरे गटाला मिळाली असून येथून अनिल देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली आहे.

“दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते”, असं मिलिंद देवरा म्हणाले.

“उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरू आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”, अशी टीका मिलिंद देवरा यांनी केली.

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : “मातोश्रीचा घरगडी पुन्हा बरळला…”, नवनीत राणाप्रकरणी भाजपाची राऊतांवर टीका

वर्षा गायकवाड दलित असल्याने त्यांचा पराभव होईल

“निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते. माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत कसं झालंय जागावाटप?

मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी काँग्रेस व ठाकरे गट यांच्यात जागावाटप झालं आहे. त्यानुसार मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ ठाकरे गटाला तर २ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यानुसार उत्तर-मध्य मुंबई व उत्तर मुंबई या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई असे चार मतदारसंघ मिळाले आहेत.