गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यानंतर सागरी किनारी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी वसईतील सागरी सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. वसईच्या खाडीतील विनाक्रमांकाच्या बोटींतून होणारा अनधिकृत रेतीउपसा, गस्तविरहित विस्तीर्ण असा निर्मनुष्य किनारा आणि किनारी भागात परप्रांतीयांची फोफावत असलेली बेकायदा वस्ती या बाबी सागरी सुरक्षेला भगदाड पाडणाऱ्या आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यांवर सतर्क राहण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वसईच्या सागरी सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
वसई खाडीत अनेक वर्षांपासून बेकायदा रेतीउपसा अर्निबधपणे सुरू आहे. अनधिकृतपणे रेती उपसा करणारे अनेक पडाव हे बेकायदा आहेत. या कोणत्याही प्रकारचे नोंदणी क्रमांक नसतात. या पडावांवरील खलाशी परप्रांतीय असतात. त्यांच्याकडे त्यांच्या ओळखीचे कोणतेही पुरावे नसतात. ही बाब सागरी सुरक्षेला धोकादायक ठरणारी आहे, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
पोलीस चौकी मद्यपींचा अड्डा
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी निर्मळ-कळंब रस्त्यालगत असलेली पोलीस चौकी आता मद्यपींचा अड्डा बनली आहे. मुंबईवर समुद्रमार्गे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने निर्मळजवळ कळंब-सुळेश्वर रस्त्याच्या तलावाच्या काठी पोलीस चौकी उभारण्यात आली होती. अर्नाळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणारी ही चौकी सध्या बंदच असते. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने निर्मळहून कळंब-अर्नाळाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना कसलाही धाक राहिलेला नाही. आता बंद असलेल्या या चौकीचा ताबा सध्या मद्यपींना घेतला आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थाची वेष्टणे यांमुळे या चौकीची दैनावस्था झाली आहे.