पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच मनसेला राम राम ठोकला. महाविकास आघाडीच्या कोट्यातून मोरेंना पुणे लोकसभेची जागा मिळू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण काँग्रेसकडे पुणे लोकसभा मतदारसंघ असून त्यांनी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वसंत मोरे पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, असे स्टेटस वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर टाकले होते. त्याप्रमाणे त्यांनी आता पुणे लोकसभेसाठी मित्र पक्षांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

काय म्हणाले वसंत मोरे?

“मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मला इथं बोलावलं. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला, त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली. पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे. पुढील काही दिवसांत कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ. पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील”, असे वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more meeting with vba chief prakash ambedkar says i will be contest pune lok sabha election rno news kvg
First published on: 29-03-2024 at 13:56 IST