कराड : कारगिल युद्धात २७ ऑगस्ट १९९९ रोजी शहीद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी- तारळे येथील जवान गजानन पांडुरंग मोरे यांची आई चतुराबाई मोरे यांना तब्बल २५ वर्षांनंतर शासनाकडून न्याय मिळाला आहे.

वीरमाता चतुराबाई मोरे यांना, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ८० गुंठे जमीन मिळाली आहे. या जमिनीचा सातबारा, फेरफार आणि इतर कागदपत्रे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चतुराबाई मोरे यांना प्रदान केली आहेत.

जवान गजानन मोरे शहीद झाल्यानंतर मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाचा आधार गमावल्याने मोरे कुटुंब हताश झाले होते. परंतु, सुरुवातीपासूनच शंभूराज देसाई हे मोरे कुटुंबाच्या सातत्याने संपर्कात राहून शासनातर्फे त्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. शंभूराज २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून त्यांच्या प्रयत्नातून प्रत्येक वर्षी शहीद जवान गजानन मोरे यांना पोलीस बँड पथकाने शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

दरम्यान, वीरमाता चतुराबाई मोरे यांनी शंभूराज देसाई यांना, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय जमिनीची मागणी केली होती. त्यासाठी देसाई शासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि शासनाकडून चतुराबाई मोरे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सडावाघापूर (ता. पाटण) येथील मुलकीपड सर्व्हे नंबर ४७/अ मधील ८० आर क्षेत्राचा ७/१२ खाते उतारा, फेरफार उतारा व अन्य कागदपत्रे वितरित करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी प्रतिक्रिया देताना, चतुराबाई मोरे यांनी शंभूराजेंना तमाम वीरमातांचा आशीर्वाद मिळेल, असे भावनिक उद्गार काढले. कारगिल युद्धात मुलगा शहीद झाल्याचे कळले, तेव्हा आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, आम्हाला पहिला मायेचा आधार हा शंभूराजेंनी दिला, हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. याच वेळी आमच्या कुटुंबाला वाऱ्यावर कधीही सोडणार नाही असा शब्दही त्यांनी दिला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले, अशी कृतज्ञता चतुराबाई मोरे यांनी व्यक्त केली.