२०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करत असले तरी कामाची गती लक्षात घेता यंदाही चाकरमान्यांचा कोकण प्रवास खडतर राहण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याविरोधात आवाज उठवला होता. आज त्यांनी ग्राऊंड रिपोर्टच सादर केला आहे.
हेही वाचा >> “कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र




मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांचा हा व्हिडीओ असून त्यांनी संगमेश्वर ते राजापूर रस्त्याची दुरावस्था या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. ते व्हिडीओत म्हणाले की, “मी माझ्या गावी चाललो आहे. सध्या संगमेश्वरपासून पाच किमी अंतरावर मी उभा असून राजापूरच्या दिशेने जात आहे. माझ्या मागे जुना मुंबई गोवा महामार्ग दिसत आहे. रविंद्र चव्हाण यांनी सांगितल्यानुसार, काहीही झालं तरी मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका कोकणवासियांच्या सेवेसाठी गणेशोत्सावआधी तयार असेल. संगमेश्वरपासून मी इथवर आलोय, पण सिंगल लेन मला कुठेही दिसली नाही. त्याआधीसुद्धा, चिपळूनपासून मधे सिंगल लेन आहे तर मधे नाहीय. इतकं प्रचंड काम बाकी आहे.”
“मंत्र्यांनी कोणत्या भरोशावर सिंगल लेन पूर्ण करेन असं आश्वासन कोकणवासियांना दिलं होतं? आमचं मंत्रिमहोदयांना एवढंच सांगणं आहे की लोकांना आवडतील अशा घोषणा करणं फार सोपं असतं. पण व्यवहाराचा कोणताही विचार न करता या घोषणा केल्यानतंर त्या पूर्ण करताना काय हालत होते, हे तुम्हाला कळलं असेल”, असंही योगेश चिले म्हणाले.
हेही वाचा >> “या सरकारचं थाटामाटात अंत्यसंस्कार करणार”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “तीन तासांसाठी…”
“पुढचे दोन महिने तरी सिंगल लेन पूर्ण होऊ शकणार नाही. आख्खा डोंगर खणायचा बाकी आहे. तो खणल्यानंतर बाकीची प्रक्रिया होणार. त्यानंतर यावर कॉन्क्रिट पडणार. म्हणजे पुढचे दोन महिने तरी काय सिंगल लेन पूर्ण होणार नाही. मंत्री इंदापूरपर्यंतच पाहणी करून घरी जात होते. पण इंदापूरच्या पुढे खरा कोकण, तळ कोकण सुरू होतो. देवाकडे प्रार्थना करुया की १९ तारखेपर्यंत जुन्या रस्त्यांवर ट्राफिक जाम होईल, त्यावेळी काहीही अघटित घडू नये”, असंही ते म्हणाले.
संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, आज सायनच्या षण्मुखानंद सभागृहात अभियांत्रिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रविंद्र चव्हाण येणार होते. परंतु, मनसेने याठिकाणी आंदोलन केले. रविंद्र चव्हाण यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दरम्यान, या कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमा प्रतिनिधींसोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे येथील वातावरण चिघळलं. तसंच, मनसे कार्यकर्त्यांसह संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.