हिंदू नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून (शिवतीर्थ)राज्यभरातील जनतेशी संवाद साधतात. राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं. यंदा ९ एप्रिल रोजी हा पाडवा मेळावा होणार असून यावेळेस राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. त्यानिमित्ताने मनसेने या मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. मध्यंतरी ते महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याकरता त्यांनी भाजपा नेते अमित शाह यांचीही भेट घेतली होती. परंतु, या भेटीत काय चर्चा झाली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या सर्व बाबींवर मेळाव्यातून राज ठाकरे संवाद साधण्याची शक्यता आहे. आज मनसेने टीझर प्रसिद्ध केला असून यामध्ये माध्यमांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे शॉर्ट्स या व्हीडिओत दाखवण्यात आले आहेत.

हेही वाचा >> राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

टीझरमध्ये काय?

राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? झाले तर किती जागा लढवणार? शिंदे गटाचं नेतृत्त्व राज ठाकरे करणार का? असे अनेक प्रश्न माध्यमांतून विचारण्यात आले होते. निवडणुकांचा विचार करून मी पावलं टाकत नाही, तर मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. त्याआधी राज ठाकरेंनी सातत्याने दिल्ली दौरे केले. त्यातच, त्यांचा अमित शाहांबरोबरचा फोटो प्रसिद्ध झाला. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला. राज ठाकरेंना मुंबईतून तीन जागा मिळणार इथपासून त्यांना धनुष्यबाण चिन्ह वापरून निवडणूक लढवावी लागेल इथपर्यंतचे तर्कवितर्क लढवले गेले. परंतु, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरीत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ९ एप्रिल रोजी शिवतीर्थवरून कळणार आहेत. तसंच, राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील पुढचा टप्पा काय, ते कोणाला साथ देणार, त्यांची रणनीती काय हेही याच दिवशी स्पष्ट होईल.