कराड : ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष न लढता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढले असते तर, ‘कराड दक्षिण’चा निकाल वेगळा दिसला असता असे मत व्यक्त करताना, आज त्यांचे पुत्र उदयसिंहांनी सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने यशवंत विचारांचा खऱ्या अर्थाने प्रीतिसंगम झाल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळस्कर आदी मेळाव्याला उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, की विलासकाका उंडाळकरांमुळे काँग्रेसची भक्कम पक्कड असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसची सन १९९९ मध्ये आणि भाजपची २०१४ मध्ये लाट असतानाही विधानसभेचा कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला. पण, आमच्या विनंतीवरून विलासकाकांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चारही पक्ष स्वतंत्र लढले तेव्हा अपक्ष म्हणून न लढता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली असती तर, ‘कराड दक्षिण’चा निकाल वेगळा दिसला असता. कारण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि पक्षाला मानणारा काही वर्ग असल्याचे पवार म्हणाले.
विलासकाका उंडाळकर यांच्या कार्याचा गौरव करताना अजित पवार म्हणाले, की विलासकाकांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ एकहाती वर्चस्व राखले. त्यांच्यामुळेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्डचे सलग अनेक वर्षे पुरस्कार मिळाले. ही बँक आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी समाजकारण, राजकारण अन् सहकारातून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान वाढवला. ते थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांचे पुत्र होते. तर, उदयसिंह हे दादांचे नातू आहेत. त्यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा असल्याचे सांगत उदयसिंह पाटील यांना सर्वतोपरी ताकद दिली जाईल, त्यांनी सुचवलेली विकासकामे निश्चितपणे मार्गी लावू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

उदयसिंह पाटील- उंडाळकर म्हणाले, की विलासकाकांचा वारसा चालवत असताना, रयत संघटनेतील कार्यकर्ते आणि जनतेचे हित जोपासणे, विकासकामाला चालना देणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याने आपण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकरंद पाटील यांनी उंडाळकर कुटुंबाच्या राजकीय ताकदीचा ऊहापोह करत माझे वडील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील आणि विलासकाकांमधील मैत्री उलगडून सांगितली. उदयसिंह पाटील आज आमच्या पक्षात जाहीरपणे सहभागी झाल्याने त्यांचे राजकीय भलेच होईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पश्चात्तापाची वेळ येणार नसल्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.