Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर काल १९ जुलै रोजी भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. बचावकार्यात अनेक अडचणी येत असतानाही दुसऱ्यादिवशी बचावकार्य सुरू आहे. रस्ता अरुंद असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे वाहन जाऊ शकत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवदेन दिलं आहे. यावेळी त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याची घोषणा आज त्यांनी पुन्हा केली.
“इर्शाळवाडीवरील प्रसंग दुर्दैवी होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असताना आपण वापरू शकलो नाही ही मनामध्ये खंत आहे. आज पुन्हा बचावकार्य सुरू आहे. पहिल्या, दुसऱ्या दिवशीही माणसं जिवंत निघाल्याची अनेक उदाहरणं इतर दुर्घटनेत आपण पाहिली आहेत”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हजणेच, ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसे सुखरूप असतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा >> मुंबईत संततधार; लोकल सेवेची नेमकी स्थिती काय? रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट…
ते म्हणाले, “एनडीआरएफ टीमचं काम वाखणण्याजोगं आहे. जीव ओतून, जीव धोक्यात घालून त्यांना काम करताना पाहिलेलं आहे. ज्या ज्या लोकांना याविषयी माहिती मिळाली ते सर्व तिथे उपस्थित होते. दुर्घटनाग्रस्त लोकांची व्यवस्था आपण तातडीने केली आहे. ३० कंटेनर आले आहेत. यामध्ये ४७ कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. टॉयलेट, बाथरूमची सोय केली आहे.”
सिडकोकडून होणार पुनर्वसन
“कायमस्वरुपी पुर्नवसन होत नाही तोवर त्यांच्या तात्पुरत्या निवारण्याची सोय करण्यात आली आहे. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. तातडीने पुनर्वसन झालं पाहिजे. पुनर्वसनासाठी सिडकोला आदेश देण्यात आले आहेत. त्यांना जागा दिल्या दिल्या त्यांनी कायमस्वरुपी घरे बांधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिली.
कॅबिनेटमध्ये निर्णय
“अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्याकरता दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचं स्थलांतर करण्याबाबत आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. या नागरिकांचं स्थलांकर करण्याचा सरकारी यंत्रणां, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु काही लोक आग्रहाने तिथेच राहतात. परंतु तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. राज्यभरामध्ये अशाप्रकारचे जे दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. पावसामध्ये दरड कोसळून दुर्घटना होऊ नये, जीवितहानी होऊ नये याककरता काळजी घेत आहोत. त्याप्रकराचा निर्णय घेतलेला आहे”, असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> मुंबईसह ठाण्यात पुढील चार तास मुसळधार पावसाची शक्यता
“जवळपास १०९ लोकांना ओळखण्यात आलं आहे. बाकींच्याचा शोध सुरू आहे. कायमस्वरुपी यांचं पुनर्वसन करण्याचं नियोजन झालं आहे. दरडप्रवण क्षेत्राच्या यादीत नसलेल्या गावांचाही विचार केला जाणार आहे. स्थानिक यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना माहित असतं की अशाठिकाणी अशाप्रकारची दुर्घटना होऊ शकेत, अशा ठिकाणीही सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांचं योग्य पुनर्वसन, राहण्याची व्यवस्था या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनाग्रस्तांच्या पाठिशी आम्ही आहोत. शासन गंभीर आहे.
विरोधकांनीही सहकार्य केलं
“जवळपास सर्वच लोकांनी सहकार्य केलं. या सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. माणुसकी काय असते, शेवटी राजकारण करायच्या वेळा असतात. विरोधी पक्षाच्या लोकांनीही सहानुभूती दाखवत सरकारला सहकार्य केलेलं आहे”, असंही शिंदे म्हणाले.
