सातारा : उत्तर कोरेगाव भागातील करंजखोप (ता. कोरेगाव) गावातील शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षक कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बुधवारी येथील शाळेला टाळे ठोकले. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी ही कारवाई केली.
रयत शिक्षण संस्थेच्या शारदाबाई गोविंदराव पवार या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षक वारंवार उशिरा येतात किंवा अनुपस्थित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागून त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, फरक पडला नाही. बुधवारीही नेहमीप्रमाणे शिक्षक वेळेवर आले नाही. विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. हा प्रकार समजताच गावकरी संतप्त झाले. ते मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले. अखेर या प्रकाराच्या निषेधार्थ त्यांनी शाळेला टाळे ठोकले. तसेच शिक्षक, व्यवस्थापन व अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
या शाळेत १८० विद्यार्थी शिकत आहेत. त्याचबरोबर या शाळेच्या सुळशी आणि नांदवळ येथे दोन भाग शाळा आहेत. एकूण ३४० विद्यार्थी येथे शिकतात. या सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह बारा शिक्षक आहेत. मुख्याध्यापकांसह सात शिक्षक उशिरा आले. तोवर मुले ताटकळत बसली होती. टाळे ठोकल्यावर शाळेभोवती मोठी गर्दी जमा झाली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गावकऱ्यांनी घेराव घातला. घटनेची माहिती मिळताच संस्थेचे सहायक विभागीय अधिकारी विनोद दाभाडे यांनी प्रत्यक्ष येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्य ग्रामस्थ शेतकरी वा मजूर आहेत. शिक्षक येत नसल्याने त्यांची मुले अनेकदा शाळेबाहेर भटकतात. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा ग्रामस्थांनी करीत शिक्षकांवर कारवाईची मागणी केली. अखेर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर वातावरण शांत झाले आणि शाळा उघडण्यात आली.
या वेळी गावातील राजेंद्र धुमाळ, सतीश धुमाळ, रमेश जाधव, पिलाजीराव धुमाळ, धनंजय धुमाळ, नितीन धुमाळ, अमोल धुमाळ, विलास जगताप, पोलीस पाटील विनोद वर्पे, ग्रामसेवक सागर पानसरे, तसेच सिराज शेख उपस्थित होते. यापुढे शिक्षक उशिरा आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. दरम्यान ग्रामस्थांच्या या तक्रारीची संस्थेने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अनुपस्थित किंवा वेळेवर न येणाऱ्या सर्व शिक्षकांना समज देण्यात येईल. त्यानंतरही वर्तणुकीत सुधारणा झाली नाही, तर नवीन शिक्षक नेमले जातील असा इशारा रयत शिक्षण संस्थेचे सहायक विभागीय अधिकारी विनोद दाभाडे यांनी दिला.