लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला लेप लावत शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यात येणार असून यासाठी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झिज होत असल्याची तक्रार सध्या मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. याविषयी औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत. यामधे प्रामुख्याने, विठोबाच्या मूर्तीचे संवर्धन व्हावे. तसेच यासाठी पुरातत्त्व खात्यास लेप लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या लेप(इपॉक्सी कोंटींग) लावण्यापूर्वी याविषयी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. हे करताना वारकरी मंडळींना विश्वासात घेतले जाणर आहे. या बाबत विधी व न्याय विभागाची मान्यता घेतली जाणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.
या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य आमदार राम कदम,आमदार सुरजितसिंह ठाकूर गैरहजर होते. मात्र आचारसंहिता लागण्याआधी समितीने बैठीकीचा सोपस्कार पूर्ण केला.