कराड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी गडकोटांना अधिक महत्त्व दिले. हे गड स्वराज्याचे खरे रक्षणकर्ते होते. आज या गडकोटांचे जतन आणि संवर्धन करणे, हीच खरी स्वराज्य सेवा असून, युवा पिढीने गडकोट जतन अन् संवर्धनासाठी ताकदीने पुढे यावे, असे आवाहन खटाव तालुक्यातील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती हभप विठ्ठलबुवा गोसावी इनामदार यांनी केले. दुर्ग बांधणी स्पर्धेतून युवा पिढीला दुर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास विठ्ठलबुवांनी या वेळी दिला.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा जिल्हा विभाग, कराड तालुका आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेमधील विजेत्या व सहभागी मुलांसाठी किल्ले भूषणगड दुर्ग दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सद्गुरू श्री जयराम स्वामी मठ (वडगाव जयराम स्वामी, ता. खटाव) येथे दुर्ग बांधणी स्पर्धेतील मुलांचा गौरव करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. मठाधिपती हभप विठ्ठलबुवा गोसावी इनामदार यांनी उपस्थितांना किल्ले भूषणगडाचा ऐतिहासिक वारसा व सद्गुरू जयराम स्वामी यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती करून दिली. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थितांच्या मनात गड संवर्धनाबाबत नवी ऊर्जा जागृत झाल्याचे दिसून आले.
सोहळ्यास सह्याद्री प्रतिष्ठानाचे दुर्गसेवक राहुल जाधव, विश्वजीत जाधव, आदित्य काटकर, सचिन माने, रुकेश यादव, सौरभ पवार, रणजित सावळे, मंगेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कार्वेतील दत्तात्रय थोरात, तसेच मठाधिपती हभप विठ्ठलबुवा गोसावी महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेला तब्बल ९० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर, विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुस्तक भेट देण्यात आले.
(त्याग अन् बलिदानाचे स्मारक)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमांसह हजारो मावळ्यांच्या त्याग, बलिदानाचे गडकोट हे जिवंत स्मारक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आत्मा या दुर्गामध्ये वसलेला असल्याने या गडांची देखभाल, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. गडसंवर्धन ही केवळ परंपरा नसून, ती इतिहासाशी असलेली आपली नाळ असल्याचा संदेश या सोहळ्यातून दिला गेला.या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा जिल्हा विभाग, कराड तालुका आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेमधील विजेत्या व सहभागी मुलांसाठी किल्ले भूषणगड दुर्ग दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.