राज्यात आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडते आहे. यासाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली असून हजारो उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तसेच संवेदनशील गावांमध्ये अधिकची कुमकही तैनात करण्यात आली आहे.
एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान
आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही मतदान होत आहे. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. तसेच सिंधुदुर्ग २९३, कोल्हापूर ४३१, सोलापूर, १४१८, नागपूर २३६, नाशिकमध्ये १९६, अहमदनगर १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
हेही वाचा – “संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी!
‘या’ ग्रामपंचायती बिनविरोध
राज्याच्या विविध जिल्ह्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये रायगडमधील ५०, बीडमधील ३४, कोल्हापूरमधील ४३, सांगलीतील २८, सिंधुदुर्गमधील ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.