सांगली : सांगलीचा पक्षी कोणता हे ठरविण्यासाठी चक्क निवडणूक जाहीर करण्यात आली असून यासाठी पाच उमेदवार पक्षी निश्चित करण्यात आले. सप्टेंबरमध्ये दर रविवारी निर्धारित केलेल्या ठिकाणी जाऊन आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.डिसेंबरमध्ये पक्षीमित्र संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर बर्ड स्वॉंग या संस्थेच्यावतीने सांगली महापालिकेचा पक्षी कोणता हे मतदानाद्वारे निवडण्यात येणार आहे. या महिन्यातील रविवारी निर्धारित सात ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करुन मतपत्रिकेद्वारे पक्षाला मत द्यायचे आहे.
या निवडणुकीसाठी तांबट, शिक्रा-ससाणा, हळदीकुंकू बदक, भारतीय राखी धनेश आणि दयाळ हे उमेदवार आहेत. निरीक्षण स्थळी पक्षीतज्ञ माहिती देण्यासाठी हजर राहणार आहेत. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार असून मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. या महिन्यातील दर रविवारी सकाळी सात ते नऊ ही मतदानाची वेळ आहे.