ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुवर्य वि. स. खांडेकर यांचे स्मृतिसंग्रहालय शिरोडा येथे साकारत आहे. त्यांचे वास्तव्य सावंतवाडी-भटवाडीत होते, तर ज्ञानदानाचे कर्तव्य त्यांनी शिरोडा येथे केले. त्यामुळे शासनाने शिरोडा या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचे घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा वि. स. खांडेकर यांचे शिरोडा येथील गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान संचालित गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयात हे स्मारक साकारत आहे. या स्मारकाचे वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ प. ना. पोतदार व संशोधक व साधन संग्राहक डॉ. सुनीलकुमार लवटे आहेत.

सावंतवाडी भटवाडी येथे वि. स. खांडेकर यांचे घर आहे. त्या ठिकाणी निवास त्यांनी केला.  शिरोडा येथे त्यांनी शिक्षणदान केले. मराठी भाषा व साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचा पहिला पुरस्कार मिळवून देणारे सुविख्यात साहित्यिक पद्मभूषण वि. स. खांडेकर यांच्या साहित्याचे पहिले बीज पडले ते शिरोडा गावी. या ठिकाणी सन १९२० ते १९३८ या कालखंडात आले. ते तत्कालीन टय़ुटोरिअल इंग्लिश स्कूलचे शिक्षक म्हणून आले आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुख्याध्यापकही बनले.

मराठी चित्रपटसृष्टीत पटकथाकार झाल्याने त्यांना शिरोडा सोडावे लागले, हे जरी खरे असले तरी सुमारे दोन दशकांच्या कालखंडात त्यांनी शिरोडय़ात शिक्षण, साहित्य, संस्कृती असा विविध गोफ विणत  कोकणच्या समाज जीवनाचे सर्वागीण दर्शन महाराष्ट्रास घडविले. संस्कृत, इंग्रजी, मराठी भाषा विषय ते शिकवीत पण इतिहास, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र इत्यादीद्वारे ते आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श समाजाचे व जागृत राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनवत.

वि. स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यातून शिरोडा पंचक्रोशीत अनुभवलेले कोकणचे तात्कालीन अज्ञान, दारिद्रय़, विषमता, अंधश्रद्धा, पारंपारिकता याचं वर्णन करून महाराष्ट्रास कोकण विकासाचं स्वप्न दिलं. हा ऐतिहासिक ऐवज, वारसा, दाखला जपण्या जोपासण्याच्या इराद्याने ‘खांडेकर व कोकण’ असा दुवा जपणारा सेतू प्रकल्प वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा यांनी सोडला आहे. २०१५ हे या संस्था आणि शाळेचे शताब्दी वर्ष आहे. शाळेची २८००० स्वे. फूट इमारत बांधून पूर्ण झालेली आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने ८५०० स्वे. फूट इमारत बांधून दिलेली आहे. उर्वरित इमारत देणगीस्वरूपात उभारली आहे.

संग्रहालय-संकल्पना व स्वरूप

नियोजित वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय हे खांडेकरांच्या शिरोडा वास्तव्य व कार्याचे जिवंत स्मारक आहे. ते त्यांच्या स्मृतिसाहित्य व वस्तूंमधून साकारले. वि. स. खांडेकरांचा शिरोडय़ातील १९२० ते १९३८ हा काळ संग्रहालयातून मूर्त होईल. त्याची पाश्र्वभूमी कोकणचा समृद्ध निसर्ग असेल.  त्याचे माध्यम शाळा खांडेकर साहित्य असेल, पण लक्ष्य मात्र कोकणचे भविष्य व समाज उज्ज्वल, उत्तम करणे राहील. त्यासाठी जया दडकर, जे या शाळेचे व खांडेकरांचे विद्यार्थी होत. त्यांच्या ‘एक लेखक आणि एक खेडे’, ‘वि. स. खांडेकर चरित्र चित्रपट’ या ग्रंथाचा आधार घेऊन आणि वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या ‘एका पानाची कहाणी’ या आत्मचरित्रास प्रमाण मानून तसेच डॉ. सुनीलकुमार लवटे संपादित ‘पहिली पावलं’ हे खांडेकरांच व मराठी साहित्यातलं पहिलं आत्मकथन सहाय्यभूत करून ‘यशाचे सिंहावलोकन’ या आत्मचरित्रपर ग्रंथाधारे संग्रहालय उभारले जाईल. त्यात पाश्र्वभूमी कोकण आहे.

या संग्रहालयाचे लक्ष्य खांडेकर जीवन, कार्य, विचार राहील. त्यातून नवी पिढी व कोकण विकास साधला जाईल. हे वस्तुसंग्रहालय वि. स. खांडेकर यांची छायाचित्रे, पत्रे, वस्तू, पुस्तके, कागदपत्रे, फिल्म, पोस्टर्स इत्यादी संग्रहित साधने असतील. खांडेकर जीवन व कार्यप्रकाश, ध्वनी, दृक् – श्राव्य दृश्यचित्रे, ध्वनिफीत, चित्रपट इत्यादीतून साकारेल. त्यासाठी टेपरेकॉर्डर, टी.व्ही., एलसीडी, प्रोजेक्टर स्क्रीन, फ्लॅट्स, पॅनल्स, स्टेज इत्यादी नेपथ्य साधन व माध्यमांचा वापर असेल. शक्यतो ‘टच स्क्रीन टेक्नॉलॉजी’द्वारे खांडेकर डिजिटल अर्काइव्ह उभारण्याचा प्रयत्न आहे.

संग्रहालयाची मांडणी

वि. स. खांडेकर यांचे आई-वडील यांची छायाचित्रे, घर व भाऊ शंकर यांचे छायाचित्र, सांगली येथील शाळा, हायस्कूल, वाचनालय सदासुख थिएटर, छायाचित्रे, तसेच नाटक, खरे शास्त्री, खाडिलकर फोटो, त्यांचे शिक्षक, मामा, वर्गचित्र, दत्तक वडील यांची माहिती असेल.

वि. स. खांडेकर इंटर परीक्षेनंतर पुण्याहून मुंबई बोटीने वेंगर्ला ते सावंतवाडी  गाडीने प्रवास मांडणी असेल. विरंगुळ्याची ठिकाणे, शाळेची ठिकाणे, तसेच शिरोडय़ास भेट देणाऱ्या मान्यवरांची माहिती मांडणीत असणार आहे.

शिरोडय़ातील साहित्य संपदा निर्मितीतील कादंबऱ्या, कथासंग्रह, लघुनिबंध, लेखसंग्रह, पटकथा, नाटक, चित्रपट तसेच खांडेकरांचे शिरोडय़ातील समाजकार्याचे दर्शनही घडणार आहे. त्यात महात्मा गांधीजी भेट व १९३०चा मिठाचा सत्याग्रहदेखील असणार आहे.

वि. स. खांडेकर यांचा संग्रहालयाच्या प्रवेशाजवळच पुतळा उभारला जाणार आहे. त्यानंतर त्यांचे जीवनप्रवास दर्शन घडेल. या स्मृतिसंग्रहालयामुळे वि. स. खांडेकर यांच्या स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाला त्यांचे जीवनदर्शन घडेल, असे स्मृतिसंग्रहालय असेल, असे या संस्थेचे रघुवीर मंत्री यांनी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vs khandekar memorial museum inspiring
First published on: 07-05-2016 at 01:41 IST