राज्य शासनाने टप्याटप्याने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले निर्बंध उठविल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून बंद असणारा पाचवड (ता.वाई) येथील जनावरांचा बाजार उद्या (मंगळवार) पासून सुरु करण्याचा निर्णय वाई कृषि उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्याच्या उद्देशाने व करोना रुग्णात वाढ होऊ नये म्हणून राज्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला पाचवड उपबजार आवारातील जनावरांचा बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होऊन, शेतकरी व व्यापारी आर्थिक अडचणीत आले होते. शिवाय, बाजार समितीचेही मोठे आर्थिक नुकसान झाले  होते. दरम्यान, उद्या ( दि ९) पासून बाजार समितीने हा जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाचवड (ता.वाई) येथील जनावरांचा बाजार सर्वात मोठा मानला जातो. या बाजारात सातारा, सांगली, सोलापूर,बारामती, पुणे या भागातील शेतकरी व व्यापारी विविध प्रकारची २५० ते ३०० खिलार व जातिवंत जनावरे, गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या, बोकड विक्रीसाठी येत असतात. यात कर्नाटकातील जातिवंत बैलांचा समावेश असतो. अंदाजे १५ ते २० लाख रुपयांची जनावरांच्या खरेदी व विक्रीची उलाढाल प्रत्येक बाजारात
होत असते.

करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात २१ मार्चपासून आठवडा व जनावरांचे बाजार बंद आहेत. १७ मार्च रोजी भरलेला पाचवड येथील जनावरांचा बाजार अखेरचा ठरला होता. तेव्हापासून हा  बाजार बंदच होता. त्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेल्या शेतकरी व व्यापारी वर्गा अडचणीत आला असून, बाजार समितीचे आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. राज्य शासनाने नियमात शिथिलता आणून काही अटी व शर्तींवर बाजार सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता खरीप हंगाम सुरू होत असून ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या आणि पेरणीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या मशागती व पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बैलाची व इतर जनावरांची गरज भासते. अशा परिस्थितीत जनावरांच्या खरेदी – विक्रीची उलाढाल मोठी होते. त्यामुळे शासनाच्या सुचनेनुसार आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळाने पाचवड येथील जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याची नोंद शेतकरी व व्यापारी यांनी घ्यावी. असे आवाहन बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दीपक बाबर व सचिव राजेंद्र कदम यांनी केले आहे.