नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर वामन मेश्राम यांनी नागपूरमधील आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो, अशी घोषणा मेश्राम यांनी केली. तसेच सर्व आंदोलकांनी परत जावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असं आवाहन केलं. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) नागपूरमध्ये बोलत होते.

वामन मेश्राम म्हणाले, “मोर्चा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर जाण्याचा किंवा सभा घेण्याचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा होता कामा नये. देशभरातून आलेल्या लाखो लोकांनी आपआपल्या वाहनांकडे जावं. प्रशासनानेही त्यांना सहकार्य करावं. आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांतता राखण्यासाठी मदत करावी.”

“कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा अवलंब करू नये”

“लाखोंच्या संख्येने लोक नागपूरमध्ये आले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व लोकांनी काम केलं पाहिजे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करता कामा नये. आम्ही हिंसेच्या बाजूने नाही. १४ ऑक्टोबरपासून सुरू केलेला चार टप्प्यातील कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे,” असं आवाहन वामन मेश्राम यांनी केलं.

आंदोलन कशासाठी?

संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत भारत मुक्ती मोर्चाने आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही.

हेही वाचा : अग्रलेख : याची दखल घ्या!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांना इंदौरी चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.