सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष योगदानातून महाराष्ट्राला मिळालेली युद्धनौका आता ‘पाणबुडी म्युझियम सेंटर’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बेटावर साकारणार आहे. या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन उद्या, मंगळवार दि. १० जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस उपस्थित होते. आमदार केसरकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ही युद्धनौका महाराष्ट्राला मिळाली असून, केंद्र शासनाकडून या पर्यटन प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा हा ‘अंडरवॉटर म्युझियम’ उद्या निवती बेटावर ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित होईल.
या प्रकल्पासाठी पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार असून, या प्रकल्पाचे काम माझगाव डॉकला देण्यात आले आहे. आमदार केसरकर यांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या नाविक दलाची स्थापना केली, त्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. ‘अंडरवॉटर म्युझियम’ सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
मोती तलावातील संगीत कारंजा लवकरच सुरू होणार:
याशिवाय, सावंतवाडी मोती तलावातील संगीत कारंजाची ‘ट्रायल’ सुरू असून, यशस्वी झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल. पुढील पाच वर्षे त्याची देखभाल कंत्राटदार करणार असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर:
सावंतवाडी शहरातून गेलेल्या संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, यामुळे दळणवळणात सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.