वर्षांतले अनेक महिने दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा असे नेहमीचे समीकरण असलेल्या लातूर शहरातील पाणी, जनावरांना चारा आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. जून महिना कोरडाच गेल्याने शहराच्या पाणीप्रश्नाची तीव्रताही वाढली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर तेलंग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आदींकडून माहिती घेतली. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपला असून, शहराला पाण्यासाठी नागझरी व भंडारवाडी तलावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. नळाद्वारे शहराला पाणीपुरवठा करणे अवघड जाणार असल्यामुळे भंडारवाडी धरणातून टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. प्रशासनाने पाणीपुरवठय़ासाठी २५० टँकरची तयारी केली आहे. लवकर पाऊस न झाल्यास पाणीप्रश्न बिकट होणार आहे. सध्या दहा दिवसांनी पाणी पुरवले जाते, ते महिनाभरातून एकदाच मिळेल काय, अशी स्थिती निर्माण होणार आहे.
शहराला एका वेळी पाणीपुरवठा करण्यासाठी २४० लाख लीटर पाणी लागते. पाणीपुरवठा करण्यासाठी मोठे टँकर मागवले, तरी त्याची क्षमता सर्वसाधारण १० हजार लीटरची असते. संपूर्ण शहराला एका वेळेस पाणीपुरवठा करण्यासाठी २ हजार ४०० टँकर पाणी आणावे लागते. हे पाणी पंपाद्वारे भरावे लागणार असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी एका दिवसात १०० टँकरपेक्षा अधिक पंिपग करणे अवघड आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी किमान २४ दिवस लागतात. यात पुन्हा तीच ती मंडळी पाणी घेण्यासाठी पुढे येतील व खऱ्या गरजवंतांना पाणी पुरवणे अतिशय जिकिरीचे जाणार आहे. प्रशासनाने टंचाईच्या उपाययोजना केल्या असल्या तरी प्रश्न सुटण्यासाठी आता मोठय़ा पावसाशिवाय दुसरा पर्याय नाही.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. जिल्हय़ात चारा उपलब्ध नसल्यास बाहेरून मागवावा काय? याचाही विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. टंचाईकाळात पाणी व चाऱ्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध केला जाणार आहे.