राष्ट्रीय एकता दिवस अनुषंगाने व “आजादी का अमृत महोत्सव ” याचे औचित्य साधून त्रिवेंद्रम (केरळ) येथून केवडीया (गुजरात) येथे प्रस्थान केलेल्या सायकल रॅलीचे आज पालघर जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सन २०२१ हे वर्ष भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे . या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. याच काळामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडून भारताच्या विविध भागांमधून राष्ट्रीय एकता सायकल रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.

अमृतसर, लखनऊ, कोलकत्ता, त्रिवेंद्रम अशा विविध ठिकाणावरून निघालेल्या सर्व सायकल रॅली ३१ ऑक्टोबर रोजी केवडीया (गुजरात) या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. तेथील सरदार सरोवर मध्ये असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याजवळ राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे.

सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली त्रिवेंद्रम केरळ येथून २९ सप्टेंबर २०१९ रोजी निघालेली आहे. या सायकल रॅलीने २२ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला व मनोर येथे मुक्काम करण्यात आला. ही सायकल रॅली आज वरई फाटा, मनोर येथून निघून वापीपर्यंत जाणार आहे. या सायकल रॅलीचे पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे व पालघर जिल्ह्यातील नागरिकांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे स्वतः सायकलिंग करत मनोर पासून वापी पर्यंत रॅली सोबत राहिले. याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या सायकल रॅली मध्ये सहभाग घेतला.

या सायकल रॅलीमुळे भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल. तसेच, भारताची राष्ट्रीय एकता व एकात्मता वाढीला लागेल अशी अपेक्षा.